सईने खुले केले बारा लाखांच्या क्लबचे दरवाजे!

मुंबई: सई ताम्हणकर ही आजच्या घडीची मराठी इंडस्ट्रीची अनभिषिक्त सम्राज्ञी ठरली आहे. कारण आतापर्यंत
कोणीही न आकारलेलं मानधन सई एका फिल्मसाठी घेऊ लागली आहे. तो आकडा तब्बल १२ लाखांच्या घरात जात आहे.
मराठी सिनेमामध्ये आतापर्यंत मक्तेदारी राहिली आहे ती केवळ पुरूष कलावंतांची. त्यांचे आकडे थेट २५ लाखांच्या घरात
जाऊन पोहोचले आहेत, पण अभिनेत्रींसाठी ते अजूनपर्यंत स्वप्नच होतं. सईचं आगामी गिरीश
मोहितेच्या सिनेमासाठी तब्बल १२ लाखांचा आकड्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन समजतं.
हा सिनेमा बिग बजेट असून सई ताम्हणकरसोबत या सिनेमामध्ये उपेंद्र लिमये दिसणार आहे. उपेंद्र अन् सई
ही जोडी एकत्रितपणे पहिल्यांदाच आपल्यासमोर येईल. यापूर्वी गिरीशने
'भारतीय'सारखा वेगळ्या धाटणीचा गेल्यावर्षी सिनेमा केला होता. सध्या तो ई टीव्हीवरच्या '1760 सासुबाई'
या मालिकेचं दिग्दर्शक करत होता, या सिनेमासाठी त्या प्रोजेक्टमधून काही काळ गिरीश सुटी घेऊन लिखाणाचं काम करत
असल्याचंही कानावर आलं आहे. हा बिग बजेट सिनेमा त्याचे ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं समजतं.
आतापर्यंत मराठी सिनेमामध्ये सुलोचनादीदींपासून, जयश्री गडकर, उमा भेंडे, सुप्रिया पिळगांवकर, वर्षा उसगांवकर ते अगदी अलका कुबल आठल्येंपर्यंत जरी नजर
टाकली तरी सुपरहिटतेचा परिस्पर्श अन् जत्रा सिनेमांमध्ये कमावण्यात येणाऱ्या गल्ल्यावर नजर टाकल्यावरही जाणवतं, पण प्रत्यक्षात मात्र अभिनेत्रींना मिळणारा आकडा हा अद्यापही पाच
लाखांच्या पलीकडे गेलेले नाहीत.
मराठी इंडस्ट्रीतली मरगळ झटकून टाकणाऱ्या अन् ब्लॅाकबस्टर या शब्दाची सवय लावणाऱ्या 'दुनियादारी' सिनेमामुळे कलाकारांनी लोकप्रियतेचं नवं शिखर गाठल आहे आणि नेमकं अशावेळी सईने
आपल्या करियरला एक नवं वळण दिलं. तिचा प्रोफेशनल अॅटिट्यूडमुळे आपल्या मानधनाचा आकडा अन् लोकप्रियतेचं शिखर या दोन्ही गोष्टींमधला सुवर्णमध्य तिने गाठला.
सई ताम्हणकर सुरूवातीच्या दिवसांमध्ये तिला ब्रेक देणारा महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणजे गिरीश मोहिते. 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेसाठी सईला ब्रेक दिला होता. पण
आता सईच्या आयुष्यातील मोनोटोनी ब्रेक करण्याचं अन् तिला मानधनाच्या आकड्यात सर्वेाच्च स्थानावर नेणारं प्रोजेक्टही गिरीशचंच आहे.
मुळात आपण त्या दिवसांपासून एकत्र काम करतोय म्हणून थोडं कमी मानधनांमध्ये हे प्रोजेक्ट करुया, असा सूर न लावता एक नवा पायंडा गिरीशने पाडला आहे., त्यासाठी त्याचं कौतुक आहेच,
पण सई ताम्हणकरने मराठी इंडस्ट्रीत बारा लाखांच्या क्लबचे दरवाजे आता अभिनेत्रींसाठी खुले केले आहेत, हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

Post a Comment

0 Comments