दीड एकरातून साडेचार लाखांची वांगी( प्रकाश पिसाळ )

सांगली : ही यशोगाथा आहे शिक्षकाची नोकरी सोडून
शेतीत करीयर करणाऱ्या प्रकाश पिसाळ यांची.
वडिलोपार्जित सात एकर शेतीतून उत्पादन घेत घेत
त्यांनी शेतीविस्तारही केला. आता त्यांच्याकडे 27
एकर जमीन आहे.
जिद्द आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर
त्यांनी ही किमया साधलीय. त्यांच्याकडे
पाण्याचा स्त्रोत म्हणून एक विहीर आहे. याच
पाण्यावर त्यांनी संपूर्ण शेतात ठिबक सिंचन केलंय.
आज त्यांच्याकडे दीड एकर वांगी, सात एकरावर
सोयाबीन, दोन एकर उस, एक एकर मिरची, दीड
एकरावर ज्वारी, सात एकर द्राक्ष बाग, मका दोन
एकर आणि इतर चारा पिके दोन एकर आहेत.
सध्या दीड एकरातील वांग्याची काढणी सुरु आहे.
या वांग्यापासून त्यांना भरघोस
उत्पादनाची अपेक्षा आहे.
पिसाळ कुटुंबात एकूण चार भाऊ, यापैकी प्रकाश
पिसाळ हे सर्वात थोरले. 1984 पर्यंत बी ए
बी एडचं शिक्षण पूर्ण केलं. सांगली जिल्ह्यातील
तडसरच्या रयत शिक्षण संस्थेतील हायस्कूल मध्ये
लगेच  नोकरीही मिळाली. याच काळात
त्यांनी पहिल्यांदा दीड एकर द्राक्ष बाग घेतली.
नोकरीमुळे त्यांना बागेकडे लक्ष
देता येईना आणि इतर भाऊही शिक्षण घेत असल्याने
त्यांच्याकडूनही करून घेता येईना. अखेर
वडिलांनी द्राक्ष बाग काढण्याचा सल्ला दिला.
मुळात शेतीची आवड असल्याने त्यांनी नोकरीलाच
रामराम करून, शेतीची निवड केली.
याचवेळी त्यांनी नोकरीतून
मिळणाऱ्या पगारीपेक्षा शेतीतून जास्त उत्पन्न
मिळवू अशी प्रतिज्ञा मनोमन केली.
ज्या दीड एकरात पूर्वी द्राक्ष बाग होती.
सतरा अठरा वर्षांनतर त्यांनी 2010 मध्ये द्राक्ष
बाग काढून तयार मांडवावर कारली घेतली.
कारल्यानंतर याच प्लॉटमध्ये
हरभरा घेतला आणि जमीन स्वच्छ करून मशागत
केली. त्यानंतर याच शेतावर त्यांनी अंकुर
पन्ना जातीच्या वांग्याची लागवड केली.
त्यासाठी 2700 रोपे लागली.
या दीड एकरातल्या वांगी लावलेल्या प्लॉटची सर्व
प्रकारची निगा आणि लावणीपश्चात मशागत केल्यानं
पीकही जोमदार आलं. पन्नासाव्या दिवशी तोडे सुरु
झाले. त्यापूर्वी त्यांनी उत्पादन वाढीसाठी जैविक
खत ठिबक मधून आणि फवारणीद्वारे दिलं.
एक ऑगस्टला पहिला तोडा झाला.
यावेळी सहा करंडी वांग्याचं उत्पादन मिळालं.
एका करंडीत 20 ते 22 किलो वांगी बसतात. प्रत्येक
तीन ते चार दिवसांनी मजुराकरवी पण
त्यांनाही हँडग्लोव्हज देऊन वांग्याची काढणी केली.
वांग्याच्या तोडणीनंतर त्यांची प्रतवार
विभागणी होते, मग करंड्यात भरून माल कोल्हापूर
मार्केटला जातो. यासाठी पिसाळ
यांना त्यांच्या कुटुंबातील सर्वजण मदत करतात.
आतापर्यंत 23 तोड्यातून त्यांना साडेपंधरा टन
उत्पादन मिळालं आहे. कोल्हापूरमार्केटमध्ये
वेगवेगळ्या वेळी त्यांना सात रूपयांपासून ते 37 रूपये
प्रति किलो असा भाव मिळाला. सध्या हा दर वीस
रूपयांच्या आसपास आहे. आतापर्यंतच्या विक्रीतून
कमीशन वगळता त्यांना तीन लाख रूपये मिळालेत.
आतापर्यंत वांगी लागवडीपासून ते
मार्केटला नेईपर्यंतचा खर्च एक लाख तीस हजार
झाला आहे. सर्व खर्च वजा जाता त्यांना दीड लाख
रूपयाचं निव्वळ उत्पन्न मिळालं आहे.
वांग्याच्या या प्लॉटमधील उत्पादन अजून दोन महिने
मिळत राहील. त्यातून 15 टन उत्पादन अपेक्षित
आहे. त्याला सरासरी 19-20 च्या आसपास भाव
मिळाला तरी किमान तीन पावणेतीन लाखाचं उत्पादन
होऊ शकतं. म्हणजेच या दीड एकरांच्या प्लॉटमधून
त्यांना चार साडेचार लाख रूपयांचं उत्पादन मिळणार
आहे. जून ते नोव्हेंबर-डिेसेंबर सात महिन्यात
त्यांना चार ते साडेचार लाख रूपये मिळणारं उत्पन्न
हे कोणत्याही निश्चित पगार
देणाऱ्या नोकरीपेक्षा नक्कीच जास्त असणार आहे.

Post a Comment

0 Comments