ना धो मनोहर शेततळं शेती

जळगाव: निसर्ग कवी आणि ज्येष्ठ शेती तज्ज्ञ
ना. धों. महानोर आपल्या शेतात नवनवे प्रयोग
करतात. आता त्यांच्या प्रयोगांना त्यांच्या डॉक्टर
मुलाची म्हणजे बाळकृष्ण महानोरांची साथ मिळत
आहे. गेल्यावर्षी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील
सोयगाव तालुक्यातील पळसखेडे गावात आपल्या ६
एकर कोरडवाहू शेतीसाठी एक शेततळे खोदले.
या शेततळ्यातच त्यांनी एक विहीर खोदली.
त्याचा जमिनीतील पाणीसाठा वाढण्यात
आणि पूर्वहंगामी कापसाचे पिक
घेण्यासाठी त्यांना चांगला फायदा झाला.
शेततळ्याच्या सिंचन सुविधेमुळे त्यांचे कापसाचे
उत्पादन एकरी ३ क्विंटलवरुन थेट १५ क्विंटलवर गेलं
आहे. ना. धों. महानोरांनी कोरडवाहू शेतीत वेगवेगळे प्रयोग
केले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या ६ एकर
कोरडवाहू
शेतीच्या सिंचनासाठी कृषी विभागाच्या मदतीने ९०
मी. लांब, ९० मी. रुंद आणि १०.५ मीटर खोलीचे एक
शेततळे खोदले. या कामात त्यांच्या डॉक्टर मुलाने
म्हणजे बाळकृष्ण यांनी विशेष रस दाखवला. ना. धों.
च्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ओढ्यालगत
असलेल्या जमिनीत शेततळे खोदले. या शेततळ्यात
त्यांनी प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर केला नाही.
त्यात ओढ्याचे पाणीही पाझरु लागले.
त्याचवेळी शेततळ्यातील पाणी भूगर्भात जिरत होते.
या पाण्याचा प्रत्यक्षात शेतीसाठी उपयोग होत
नव्हता. मग ना. धों. यांनी या शेततळ्यात एक २०
फूट खोल शेवडी म्हणजे एक छोटी विहिर खोदली.
विहिरीसाठी त्यांनी वीज कनेक्शन घेतले. शेततळ्यात
विहिर असल्याने उन्हाळ्यातही तिला चांगलं
पाणी मिळू लागलं. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून
या कोरडवाहू जमिनीत ते ठिबकवर
पूर्वहंगामी कापसाचे पीक घेत आहेत.
पाण्याची सोय असल्याने महानोर
पितापुत्रांनी ठिबकवर ५ फूट बाय २ फूट अंतरावर
कापसाची लागवड केली आहे. सिंचन सुविधेमुळे इथले
कापसाचे उत्पादन एकरी ३ क्विंटलवरुन थेट १५
क्विंटलवर गेलं आहे. यंदा त्यांना सध्याच्या ४ ते
४.५ हजार रुपयांच्या भावानुसार एकरी ६० ते ६५
हजार रुपयांच्या उत्पन्न मिळेल. त्यातून एकरी ५ ते
७ हजार रुपयांचा खर्च वगळता ५५ ते ५७ हजार
रुपयांचं उत्पन्न मिळेल. तर ६ एकरातील कापसाचे
त्यांना ३ ते ३.५ लाख रुपयाचे निव्वळ उत्पन्न
मिळेल असा अंदाज आहे.
ऑक्टोबर महिन्यात
कापसाच्या पिकाला पाण्याची गरज असते.
नेमक्या याच काळात पावसाचा ताण पडतो. त्यामुळे
ऑक्टोबरमध्ये कापसाला संरक्षित पाणी मिळाल्यास
कापसाच्या उत्पादनात वाढ मिळते. गेल्या २
वर्षांपासून याचा अनुभव ते घेत आहेत.
महानोरांकडील कपाशीला कोणतीच
फवारणी करावी लागली नाही. कपाशीच्या झाडावर
मुंगळ्यांचे प्रमाण वाढलेले आढळले. त्यानंतर अनेक
किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण झाले. फवारणी न
केल्याने खर्च कमी झाला आणि झाडावरील
मुंगळ्याची क्रियाशिलता वाढल्याचा किडींच्या नियंत्रणासाठी फायदाच
झाला.
कापसाच्या आठमाही पिकाला ऑक्टोबरमध्ये
पाण्याची सोय झाल्यास त्यापासून उत्पादनात वाढ
मिळवता येते असा महानोरांचा अनुभव आहे. पण
यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळे
आणि त्यात शेवडी म्हणजे विहीर खोदावयास हवी.
सरकारने कापसाच्या सिंचनासाठी हंगामी वीज
कनेक्शनची व्यवस्था केली तर शेततळ्यातील
पाण्याचा पिकांच्या उत्पादनवाढीसाठी खऱ्या अर्थाने
उपयोग करुन घेता येईल हे महानोर
पितापुत्रांनी दाखवून दिले आहे.

Post a Comment

0 Comments